सर्वोच्च न्यायालयाने चायना 'मांजा'चा वापर आणि विक्री यावर पूर्णपणे बंदी आणली आहे. तरीदेखील जिल्ह्यात दरवर्षी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर चायना मांजा विक्रीस येतो.आतापर्यंत चायना मांजाच्या फासामुळे ५ गाय बगळे, ४ कबुतर , एक गव्हाणी घुबड असे एकूण ९ पक्षी आणि एक 'वटवाघूळ'चा प्राणी मांजाचा फास लागून मृत्युमुखी पडले होते आहेत
पुढील महिन्यात मकरसंक्रांत आहे. यानिमित्त महिनाभर अगोदरपासून पतंग उडविण्याचा आनंद लुटला जातो. मात्र पतंगासाठी काहीजण चायना मांजाचा वापर करतात, ज्यावर बंदी आहे. यामुळे पोलिसांनी चायना मांजाच्या विक्री व वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
बंदी असतानाही चायना मांजा विक्रीस आल्याचे निदर्शनास येत आहे. जुने जळगाव भागासह इतर परिसरात चायना मांजा विक्री केली जातो. होलसेल मांजा विक्रेते शहरातील इतर भागातील लहान मोठ्या दुकानदारांना चायना मांजा पुरवितात. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, महापालिका, पोलिस अधीक्षकांनी मांजा विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करावी, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे आज करण्यात आली आहे.
शहरातील ट्रान्सपोर्टमध्ये येणाऱ्या मांजा मालाची ट्रान्स्पोर्ट मधेच तपासणी केली जावी. जेणे करून चायना मांजा शहरात येणार नाही. पतंग उडवताना चायना मांजाचा वापर करत असल्यावर देखील कारवाई करण्यात यावी. पतंग उडवणारे अल्पवयीन असतील आणि त्यांच्या जवळ चायना मांजा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जावी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाने भरारी पथके नेमून चायना मांजा बंदीबाबत कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, असे मत वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे स्वयंसेवक बाळकृष्ण देवरे यांनी व्यक्त केले आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यासह नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात चायना मांजा दुष्परिणामाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती संस्था अध्यक्ष रवींद्र फालक यांनी दिली.
१९ पक्ष्यांचा वाचविला जीव
मांजात पाय , पंख अडकलेले १२ गाय बगळे, एक शृंगी घुबड, ४ कबुतर एक चिमणी, एक पोपट, एक कावळा असे १९ पक्षी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षीमित्रांनी सुखरूप मुक्त केले होते. वाल्मीक नगर येथे ७० फूट उंचीवर पिंपळाच्या झाडावर चायना मांजात अडकलेले शृंगी घुबड रेस्क्यू करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभाग, वन्यजीव संरक्षण संस्था यांनी मध्यरात्री बचाव मोहीम राबवली होती.
''मकरसंक्रांतिच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात चायना मांजा विक्रीसाठी येणार असल्याने शहरातील मांजा, पतंग विक्रेत्यांची एकत्रित बैठक बोलावून त्यांना होणाऱ्या कारवाईबाबत निर्देश दिले जावे. संस्थेतर्फे जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते.'' - रवींद्र फालक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था.
